ब्राह्मण महासंघ, डोंबिवली

राष्ट्रसीमा - "माझे योगदान आणि कर्तव्य"

 

"वसुधैव कुटुम्बकम्" हीच आपली विचारधारा व उदार भावना आपण मानत आलो आहोत आणि हीच मंगलकारी संकल्पना राष्ट्र या नावाने आपल्यामध्ये रुजली आहे. अर्थातच आपला सदाचार व उचित व्यवहार यामुळेच आपले अस्तित्व आजही टिकून आहे. अशी विचारधारा बाळगलेला हा समाज गेली हजारो वर्षे या भूमीतील प्रत्येक व्यक्तीला आपले कुटुंबीय मानत आला आहे ही अभिमानाची बाब आहे.
  "जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरियसी" हा भाव आजही आपल्यामध्ये घर करून आहे. 

राष्ट्र या शब्दाला तर वैदिक साहित्यामध्ये महत्वाचे व मोठे स्थान आहे. विशेषतः ऋग्वेदामधे राष्ट्र या शब्दाची पुनरावृत्ती जागोजागी केलेली आढळते. 

ध्रुवं ते राजा वरुणो ध्रुवं देवो बृहस्पति ।
ध्रुवं  त इंद्रश्चाग्निश्च राष्ट्रं धारायता ध्रुवम् ।।

वरुण, बृहस्पति, इंद्रदेव आणि अग्निदेव यांनी या राष्ट्राला स्थायित्व द्यावं, सबल करावं आणि सुनिश्चल रूप द्यावं असं ही प्रार्थना सांगते. यामध्ये समर्पणाची भावना स्पष्टपणे दिसून येते. राष्ट्राच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असावे आणि मातृभूमीप्रती सदैव कार्यशील व प्रामाणिक असावे हाच दृष्टिकोन बाळगून आपण या राष्ट्राचे नेतृत्व आजवर प्रतिभावंत व ठाम विचारांच्या सक्षम व्यक्तीकडे सोपवत आलो आहोत. ज्यामुळे प्रखर अशी वीरभवना आपल्यामध्ये जागृत आहे. संकटे जरी चारही दिशांनी आली आणि जीवन जरी कितीही कष्टप्रद झाले तरी आपण सदैव आपल्या राष्ट्राच्या उन्नतीसाठी कार्यरत राहू या एकमेव प्रखर भावनेचे आम्ही पाईक आहोत.
या राष्ट्राच्या सीमा अबाधित ठेऊन त्याच्या रक्षणासाठी आमच्या हजारो वीरपुत्रांनी आजवर केलेले प्राणार्पण आम्ही कदापि विसरणार नाही. याचबरोबर राष्ट्रोन्नतीसाठी हर प्रकारे योगदान देणे हे आमचे प्रधान कर्तव्य आहे याचा आम्ही पुनरुच्चार करतो. या परमप्रिय भूमीचे आदर्श नागरिक म्हणून कोणत्याही अधिकाराची अभिलाषा न बाळगता आम्ही आमची विहित कर्तव्ये वेळोवेळी व प्रामाणिकपणे पार पाडू असा सार्थ विश्वास आजच्या वर्षप्रतिपदेच्या पवित्र दिनी देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.
 
।। जय जवान जय हिंद ।।