डोंबिवली, मुंबईच्या जवळच असलेलं ठाणे जिल्हातील एक प्रमुख शहर. डोंबिवली शहराला ६०० वर्षांचा इतिहास आहे आणि असं म्हटलं जातं की येथील मूळ निवासी डोंब लोकांवरून ह्या शहराला हे नाव पडले. मुंबई सारख्या मुख्य शहरापासून या शहराला जवळचा रास्ता नाही आणि म्हणून सर्व भिस्त रेल्वेवर असतानाही या शहराचा विकास सर्व जातीच्या समाजबांधवांकडून होत राहिला. त्यात ब्राह्मण समाजाचेही भरपूर योगदान आहे. मुंबईतील वाढत्या शहरीकरणामुळे अनेक ब्राह्मण कुटुंबे दादर, गिरगाव मधून डोंबिवलीत स्थलांतरित झाली. जसं जशी लोकवस्ती वाढत तसं तसे ब्राह्मण पोटजातीत वेग वेगळे संघ स्थापन होऊ लागले. कालांतराने महाराष्ट्रीय ब्राह्मण संघटनांना आपण एकत्र आलो तर एक मोठी शक्ती निर्माण होऊन स्वतःबरोबरच संपूर्ण समाजाचा विकास अधिक चांगल्या पद्धतीने करता येईल असा विचार पुढे आला व त्या दृष्टीने प्राथमिक स्तरावर १९९६ च्या दरम्यान चर्चा सुरु झाल्या. चर्चेअंती सर्व महाराष्ट्रीय ब्राह्मण संस्थांचा संघ असावा असं ठरलं व त्यात कऱ्हाडे ब्राह्मण संघ, चित्तपावन ब्राह्मण संघ, देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ, शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण सभा, देवरुखे ब्राह्मण संघ, ब्राह्मण सभा व कण्व परिषद असे सात संघ एकत्र येऊन ब्राह्मण महासंघ डोंबिवली ची स्थापना झाली. ...

श्री. प्रभाकर कोनकर यांच्या अध्यक्षतेखाली पहिली कार्यकारिणी कार्यरत झाली आणि प्रत्यक्ष कामाला १९९८ साली सुरवात झाली. सुरुवातीला सर्व संस्थांच्या वास्तूत टप्प्या टप्प्याने सभा होऊ लागल्या व सर्व ब्राह्मण वर्गाला एकत्र करण्याच्या उद्देशाने  नोव्हेंबर १९९८ रोजी टिळकनगर विद्यालय डोंबिवलीच्या भव्य पटांगणात पहिल्या ब्राह्मण परिषदेचे आयोजन करण्यात आले. कॅम्लिन चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. सुभाष दांडेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्याच दरम्यान १०/१२ च्या विद्यार्थ्यांचा मार्गदर्शन शिबीर व डोंबिवलीतील ब्राह्मण उद्योजकांची सूची प्रकाशित करण्यात आली. 

सन २००० साली दुसरे अधिवेशन जोंधळे विद्यालयाच्या प्रांगणात झाले तेव्हा श्री. मनोहर जोशी व श्री. प्रकाश जावडेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या परिषदेत तळेगाव, नाशिक, बेळगाव, इत्यादी ठिकाणाहून स्वयंस्फूर्तीने प्रतिनिधी उपस्थित होते. यानंतर पुढील दोन वर्षांसाठी सर्वानुमते श्री. अशोक हुक्केरी यांची अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. या काळात जनसंपर्क वाढविण्याबरोबरच युवा वर्गाला एकत्र आणणे, विद्यार्थी मार्गदर्शन, व्यवसाय मार्गदर्शन इत्यादी उपक्रमाबरोबर स्वागत यात्रेतही ब्राह्मण महासंघाचा सहभाग होऊ लागला. सन २००२ साली ब्राह्मण महासंघाचे तिसरे अधिवेशन डोंबिवली पश्चिम येथील जोंधळे विद्यालयाच्या भव्य पटांगणावर संपन्न झाले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त माननीय श्री. टी. एन. शेषन आणि विशेष सन्माननीय पाहुणे म्हणून  बांधकाम क्षेत्रात नावाजलेले व्यावसायिक माननीय श्री. डी. एस. कुलकर्णी उपस्थित होते. या वेळी प्रथमच डोंबिवलीतील सर्व वयोगटातील ८० ब्राह्मण कलाकारांनी एकत्र येऊन "सण वर्षाचे, दिन हर्षाचे" हा श्री. प्रशांत जोशी यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य कार्यक्रम सादर झाला. श्री. विवेक ताम्हणकर, कै. विवेक नेर्लेकर, श्री. मिलिंद जोशी, श्री. विश्वास भावे इत्यादी अनेक नामवंत स्थानिक कलाकार यात सहभागी झाले होते. सादर कार्यक्रमाची अनेक मान्यवरांनी दाखल घेतली होती. या अधिवेशनाला विप्रमंगल या नावाची विशेष स्मरणिका प्रकाशित करण्यात आली होती.

सन २००४ पासून श्री. सुनील जोशी यांनी ब्राह्मण महासंघाची धुरा सांभाळली. जनसंपर्क वाढविण्याच्या दृष्टीने ब्राह्मण ज्ञातिबांधवांसाठी अनेक छोटे मोठे कार्यक्रम, उपक्रम करण्यात आले. यात सर्व वयोगटासाठी बुद्धिबळ स्पर्धा, पाऊस गाणी स्पर्धा अशा विविध स्पर्धांचाही समावेश होता. विविध उपक्रमाबरोबरच महासंघाचे चौथे अधिवेशन जोंधळे विद्यालय, डोंबिवली येथे संपन्न झाले. तेव्हा प्रमुख पाहुणे म्हणून विद्यमान लोकसभा अध्यक्ष सौ. सुमित्रा महाजन व प्रसिद्ध उद्योजक, पीतांबरीचे श्री. रवींद्र प्रभुदेसाई उपस्थित होते. करमणूक कार्यक्रम प्रसिद्ध राशी चक्रकार श्री. शरद उपाध्ये यांनी सादर केला. सदर अधिवेशनाला सुमारे २००० हून अधिक ब्राह्मण ज्ञातीबांधव उपस्थित होते. 

सन २००६ ते २००८ या कालावधीसाठी श्रीमती मंगला कुलकर्णी यांची अध्यक्षपदी निवड झाली. सर्व ब्राह्मण संस्थांना एकत्र ठेवून मंगलाताई व कार्यकारी मंडळाने सदर कार्य चालू ठेवले. ब्राह्मण महासंघ डोंबिवली चे पाचवे संमेलन विद्यमान केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत जोंधळे विद्यालय, डोंबिवली पश्चिम येथे संपन्न झाले.

सन २००८ साली ब्राह्मण महासंघाचे अध्यक्षपद श्री. माधव घुले यांनी स्वीकारले. शैक्षणिक उपक्रमांना तसेच महिलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना प्राधान्य देत वर्ष २००९ मध्ये  संत ज्ञानेश्वर सभागृह, डोंबिवली पश्चिम  येथे सुमारे ६०० बांधवांच्या उपस्थितीत एका संमेलनांचे आयोजन करण्यात आले. तेव्हा प्रमुख पाहुणे म्हणून विख्यात राजकीय व सामाजिक विश्लेषक श्री.  संदीप वासलेकर उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात ब्राह्मण समाजाने दिलेल्या योगदानाचा त्यांनी आढावा घेतला. 

यानंतर सन २०११ ते २०१३ या कालावधीसाठी सर्वानुमते प्रा. विरुपाक्ष कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. विविध उपक्रमाबरोबरच शैक्षणिक उपक्रमांचे तसेच आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले.

सन २०१३ साली अध्यक्षपदाची सूत्रं डॉ. प्रा. विनय भोळे यांनी स्वीकारली व त्यांनी जास्तीत जास्त युवा वर्गाला कार्यकारिणीत सामावून घेतले. यावेळी सावित्रीबाई फुले सभागृहात एका संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते तेव्हा सुप्रसिद्ध बासरी वादक श्री. अमर ओक यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सर्व ब्राह्मण समाजामध्ये जागृती आणण्यासाठी लोकमान्य टिळक, महर्षी कर्वे, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांसारख्या महान व्यक्तींचे कार्य सर्व युवा पिढीसमोर येण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. 

यानंतर सन २०१६ साली महासंघाच्या अध्यक्षपदाची धुरा श्री. प्रज्ञेश प्रभुघाटे यांनी स्वीकारली. तदनंतर महासंघाची घटना नक्की करून ब्राह्मण महासंघ डोंबिवली, सरकार दरबारी नोंदणीकृत केला. तसेच निधी संकलना बरोबर व्यक्तिगत सभासद नोंदणी पण सुरु केली. सन २०१७ साली स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर जयंती निमित्त अभिनेते श्री. शरद पोंक्षे यांच्या दर्जेदार व्याख्यानाचे आयोजन ब्राह्मण सभा डोंबिवलीच्या सभागृहात करण्यात आले होते. सन २०१८ साली नववर्ष स्वागत यात्रेच्या निमित्ताने संपर्क अभियाना  अंतर्गत डोंबिवलीतील विविध ७५ संस्थांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सामाजिक सलोखा निर्माण करण्याच्या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भव्य प्रमाणात साजरी करण्यात आली. त्या प्रसंगी प्रमुख वक्ते डॉ. सुनील कांबळे आणि डॉ. सुवर्णा रावळ हे उपस्थित होते. तसेच स्वातंत्रवीर सावरकर जयंतीच्या निमित्ताने कु. गीता उपासनी यांचे 'सावकर विचारदर्शन' यावर व्याख्यान आयोजित केले होते. तेव्हा प्रमुख पाहुणे म्हणून सी. ए, चंद्रशेखर वझे उपस्थित होते. सन २०२०, २०२१ हा करूनच काळ सर्वांचा कठीण गेला. सर्वच व्यवहार ठप्प झाल्याने अनेक व्यावसायिक कठीण परिस्थीतीतुन जात होते. महासंघातर्फे अनेकांना विशेष करून ब्रह्मवृंदांना वस्तुरूप व आर्थिक सहकार्य करण्यात आले.

सन २०२२ पासून ब्राह्मण महासंघाच्या अध्यक्ष पदाची धुरा युवा कार्यकर्ते श्री. मानस पिंगळे हे सांभाळत आहेत.